महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना मुंबई येथील सोहळ्यात ‘सीएसआर हिरोज अवॉर्ड २०२५’ प्रदान

पुणे: सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन आणि बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्या हस्ते ‘सीएसआर हिरोज अवॉर्ड २०२५’ने गौरविण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचा सन्मान करण्यात आला. मुंबईत झालेल्या सोहळ्यात ‘सूर्यदत्त’सह इतर नामवंत संस्थांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

याप्रसंगी मेघाश्रेय फाउंडेशनच्या संस्थापक विश्वस्त सीमा सिंग, बजाज फाउंडेशनचे शिशीर बजाज, नवभारत ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक  निमिष माहेश्वरी आदी उपस्थित होते. सीएसआरच्या माध्यमातून भरीव योगदान दिलेल्या उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. जेएसडब्ल्यू फाउंडेशन, सचिन तेंडुलकर फाउंडेशन, पीएनजी ज्वेलर्स, एल अँड टी ग्रुप, टाटा मोटर्स, एसबीएआय फाउंडेशन, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, क्रॉम्प्टन अँड ग्रीव्ह्ज, ग्रांट मेडिकल फाउंडेशन व अन्य संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी जात, धर्म, आर्थिक, भौगोलिक व लिंगभेद याच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्वच स्तरांतील मुलामुलींना शिक्षण देण्यासह त्यांना प्रोत्साहन आणि अर्थसहाय्य करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या याच निस्वार्थी भावनेने केलेल्या कार्याचा हा गौरव आहे. प्रा. डॉ. चोरडिया यांनी ‘कमवा आणि शिका’ या उपक्रमाअंतर्गत २५०० हून अधिक काम करणाऱ्या व्यावसायिकांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन, त्यांना त्यांच्या संस्थांमध्ये अधिक चांगल्या संधी उपलब्ध होण्यास सहकार्य केले आहे.
गरजू आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारित शिक्षण, इंग्रजी व संगणक शिक्षण दिले आहे. महिला, कुली, रिक्षाचालक यांच्यासाठीही विशेष प्रयत्न केले आहेत. ग्रामीण व आदिवासी भागातील ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप, वैद्यकीय शिबिरे, सामाजिक जनजागृती शिबिरे यांचे आयोजन केले आहे. फूडबँक, क्लोदिंग बँक, नॉलेज बँक, ब्लड बँक, स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन अशा उपक्रमांद्वारे सामाजिक कार्यात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. समाजात परिवर्तन घडावे, सामाजिक उन्नती व्हावी व सर्व स्तरांतील लोकांचे शाश्वत पुनर्वसन व सक्षमीकरण व्हावे, यासाठी प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया सातत्याने प्रयत्नशील असतात.

 

Leave a Comment