पुणे: सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन संचालित सूर्यदत्त विधी महाविद्यालयातर्फे गावकऱ्यांमध्ये कायदेशीर हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी, स्थानिक कायदेशीर तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि रहिवाशांना कायदेशीर सहाय्य देण्यासाठी भूगाव ग्रामपंचायत येथे मोफत कायदेशीर मदत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भूगाव ग्रामपंचायत चे  जे. एम. भोंग, सूर्यदत्त विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय मणियार, विधी सहाय्य समितीचे सदस्य ॲड. कलिश गोळे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. मोनिका सेहरावत आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. विजयदीप मुंजनकर आदी उपस्थित होते.

या शिबिरामध्ये ५० हुन अधिक विद्यार्थी-शिक्षक सहभागी झाले होते. कायद्यातील तज्ञांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी वैयक्तिक पातळीवर प्रश्नांची उत्तरे देत, गावकऱ्यांना मोफत कायदेशीर सल्ला दिला. चर्चा केलेल्या सामान्य समस्यांमध्ये जमीन विवाद, कौटुंबिक संघर्ष आणि भाडेकरू-मालक मतभेद यांचा समावेश होता. या शिबिरात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांसह गावातील अनेक नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.  मोफत कायदेशीर सहाय्य सेवा सारख्या सरकारी योजनांबद्दल माहिती देखील यावेळी देण्यात आली. ॲड. कलिश गोळे यांनी मूलभूत हक्क आणि त्याचे महत्त्व स्पष्ट केले. मालमत्ता अधिकार, कौटुंबिक कायदा, घरगुती हिंसाचार, बालहक्क आणि ग्राहक संरक्षण या विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी ग्रामीण समुदाय आणि कायदेशीर व्यवस्था यांच्यातील दरी कमी करण्यासाठी भुगाव गावातील कायदेशीर मदत शिबिर हे एक महत्वाचे पाऊल असल्याचे नमूद केले. या शिबिरातून रहिवाशांना त्यांच्या हक्कांबद्दल शिक्षित केले जात असून, त्यांना आत्मविश्वासाने न्याय मिळवण्यासाठी सक्षम केले जाईल. सूर्यदत्तने हाती घेतलेले विविध शैक्षणिक-सामाजिक उपक्रम हे विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षण देण्यासाठी असतात. या शिबिरामधून कायद्याच्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आणि अनुभवात्मक शिक्षण मिळेल व ते सर्व यशस्वी वकील बनतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. व्यक्तिगत सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून प्रत्येक विद्यार्थी व नागरिकाने विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी आपापल्या क्षेत्रात योगदान देऊन राष्ट्रउभारणीसाठी हातभार लावावा, असे आवाहनही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले.

Leave a Comment