शांतशील संयममूर्ती: पू. आनंद ऋषीजी म.सा. यांची जीवनगाथा – प. पू. श्री मुकेश मुनीजी म. सा. !

आज आपण पूज्य आनंद ऋषीजी म.सा. यांची १२६ वी जन्म जयंती निमित्त त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाचे गुणगान करणे हा आत्मिक गौरवाचा क्षण आहे.

अल्पवयातच त्यांनी आपल्या गुरूप्रती अढळ श्रद्धा, प्रगाढ भक्तिभाव व संपूर्ण समर्पणभाव जोपासला. त्यांनी अत्यंत विनयशीलतेने आगमशास्त्राचे गहन अध्ययन केले आणि तप-जप यांच्या माध्यमातून आत्मिक उन्नती साधली. अखेर त्यांनी संघात अत्युच्च “आचार्य पद” प्राप्त करून आत्मिक तेजाने संघाला प्रकाशित केले.

त्यांचे संपूर्ण जीवन संयम व सेवा यांचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांनी कधीही क्रोध केला नाही, आणि कोणतीही स्थिती असो, मन:शांती व क्षमा त्यांच्या वर्तनात सदैव दिसून आली. शिक्षण घेताना वयाने व दर्जाने लहान असणाऱ्या व्यक्तीकडूनही शिकण्याची तयारी ठेवत, त्या गुरूचा सन्मान करत आपले आसन सोडण्याची नम्रता त्यांनी दाखवली. यातून त्यांच्या विनयशीलतेचा प्रत्यक्ष प्रत्यय येतो.

जो व्यक्ती नम्रपणे ज्ञान ग्रहण करतो, तोच खरा ज्ञानी ठरतो. आनंद ऋषीजी म.सा. यांच्या व्यक्तिमत्त्वात क्षमा, सहिष्णुता, करुणा, समत्व, आणि आत्मिक शुद्धता हे सर्व गुण भरभरून होते.

प्रशंसा आणि अपमान यांच्याकडे समतेने पाहणं हे साधकासाठी आवश्यक आहे. जर एखाद्याने प्रशंसेत हरखून जाऊन आपले कर्तव्य विसरले, तर प्रगती अडते. तसेच अपमान झाल्यावर क्रोधाने व्यवहार सोडून दिल्यास, आत्मोन्नती शक्य होत नाही.

राग आल्यास त्याचे तांडव होऊ न देता, तो योग्य प्रकारे शब्दांत मांडावा. आपली भावना शांत आणि मर्यादित भाषेत मांडल्यास, समोरच्यालाही राग येणार नाही आणि त्याच्या चुकांचे भानही येईल.

मन:शांती मिळवण्यासाठी प्रयत्न, अभ्यास आणि आत्मचिंतन आवश्यक आहे. चांगले ग्रंथ वाचल्यामुळे मनावर नियंत्रण येते. एकांतात चिंतन आणि मनन केल्यास आपण अंतर्मुख होतो आणि आत्मप्रगतीकडे वाटचाल होते.

आनंद ऋषीजी म.सा. यांचे जीवन म्हणजे संयम, नम्रता आणि आत्मिक तेज यांचा आदर्श संगम आहे. त्यांचे विचार आणि कार्य हे प्रत्येक साधकासाठी दीपस्तंभासारखे आहेत — जे अंध:कारमय कर्मबंधनातून मुक्तीच्या प्रकाशाकडे वाट दाखवतात.

Leave a Comment