आनंद दर्शन युवा मंच पुणे या जैन समाजातील एकमेव सक्रिय युवा मंचाने आपला सातवा भव्य गेट-टुगेदर रविवार, २७ व सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी प्रथमेश रिसॉर्ट, खेड शिवापूर येथे विथ कपल स्वरूपात मोठ्या उत्साहात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा केला.
गेल्या १७ वर्षांपासून १५,००० हून अधिक युवक व कुटुंबीय या मंचाशी थेट जोडले गेले आहेत, तर सध्या सक्रिय सदस्यांची संख्या साडेतीनशेच्या पुढे आहे. धावपळीच्या जीवनात आनंदाचे क्षण जपतानाच धार्मिक आणि सामाजिक कार्याची नाळ घट्ट ठेवणारा हा मंच समाजात वेगळी ओळख निर्माण करत आहे. दरवर्षीची क्रिकेट टूर्नामेंट, हुरडा पार्टी यासारखी अनोखी पारिवारिक आयोजनं या मंचाच्या उपक्रमांना खास बनवतात.
यंदाच्या गेट-टुगेदरमध्ये रुचकर भोजन, स्विमिंग, इंडोअर-आउटडोअर गेम्स आणि मनोरंजनात्मक स्पर्धा यांचा मनमुराद आनंद सर्वांनी लुटला. हास्यविनोद, गप्पा-गोष्टी आणि खेळाच्या रंगात सर्वांनी मनसोक्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष महेंद्र सुंदेचा यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ धोका, आनंद गादिया, करण लोढा, साहिल चोपडा या सक्रिय सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. मनोरंजक गेम्सचे विशेष आयोजन महेश लुंकड व अश्विनी लुंकड यांनी केले.
कार्यक्रमाच्या सांगतेवेळी अध्यक्ष महेंद्र सुंदेचा म्हणाले,
“आपल्या मंचाची खरी ताकद ही एकतेत आहे. वर्षभर कामाच्या व्यापात एकमेकांसोबत असे काही क्षण अनुभवणे हीच खरी आपली जमेची बाजू आहे.
पुढील उपक्रमात आणखी नावीन्यपूर्ण गोष्टी घेऊन भेटू!”
अध्यक्ष महोदय यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानत पुढील उपक्रमांसाठी सर्वांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
या गेट-टुगेदरने पुन्हा एकदा आनंद दर्शन युवा मंचाच्या बंधुभाव, एकात्मता व सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे.