हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालय (स्वायत्त), पुणे येथे सायबर सिक्युरिटी अभ्यासक्रमाचा प्रेरण (इंडक्शन) कार्यक्रम संपन्न !

सोमवार, दि. २८ जुलै २०२५ रोजी हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालय (स्वायत्त), पुणे येथे बी. एस्सी. सायबर सिक्युरिटी (B.Sc. Cyber Security) अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीचा प्रेरण (इंडक्शन) कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून स्वप्नाली शिंदे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर शाखा, पुणे) उपस्थित होत्या. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी स्पर्धा परीक्षेतील संघर्ष आणि यशोगाथेचा स्वानुभव विद्यार्थ्यांसमोर मांडताना सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील भविष्यातील करिअर संधी विशद केल्या. यामध्ये पोलीस विभागातील सायबर सेल, एथिकल हॅकिंग, स्वतंत्र फॉरेन्सिक लॅब उभारून कंपन्यांचे सायबर ऑडिट यांसारख्या विविध घटकांचा त्यांनी आढावा घेतला. काळाची पावले ओळखता सायबर सिक्युरिटी क्षेत्रात भविष्यात करिअरच्या अनेक नानाविध संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

संगणकशास्त्र विभागप्रमुख ज्योती मालुसरे यांनी सायबर सिक्युरिटी अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले. त्यांनी विभागाच्या प्रगतीचा आढावा सादर करताना विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजूंबाबत सजग राहण्याचे आवाहन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाची थोडक्यात ओळख करून देतानाच सायबर सिक्युरिटी अभ्यासक्रमाची गरज व उपयुक्तता स्पष्ट करत दैनिक जीवनातील सायबर गुन्ह्यांची उदाहरणे दिली व विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचे महत्त्व पटवून दिले.

दि पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेशभाई शहा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व संस्थेच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. महाविद्यालयाने या वर्षी सुरु केलेल्या सायबर सिक्युरिटी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले, तसेच हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी वर्षभर सातत्याने मेहनत घेणाऱ्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले.

कार्यक्रमाचे समन्वयन ज्योती मालुसरे, भूषण शाह आणि नरेंद्र देवरे यांनी केले. उपप्राचार्य डॉ. हेमंत भिसे यांनी आभार प्रदर्शन तर शैलजा गुजराथी यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Comment