पुणे, ज्येष्ठ उद्योजक नितीन देसाई हे केवळ देसाई उद्योग समुहापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांच्यातील अंगभुत कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्वाच्या गुणांमुळे अनेक संस्थांचे ते खंबीर पाठीराखे होते, अशा शब्दात दिवंगत ज्येष्ठ उद्योजक नितीन देसाई यांना दी पूना गुजराती केळवणी मंडळाचे चेअरमन राजेश शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
दिवंगत ज्येष्ठ उद्योजक नितीन देसाई यांना अभिवादन करण्यासाठी श्री पूना गुजराथी बंधू समाज, दी पूना गुजराती केळवणी मंडळ, दी पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन, एच.व्ही. देसाई आय हॉस्पीटल आणि जनसेवा फौंडेशन यांच्यावतीने आयोजित प्रार्थना आणि श्रद्धांजली सभेत डॉ. राजेश शहा बोलत होते.
या प्रार्थना सभेच्या प्रारंभी एच.व्ही. देसाई आय हॉस्पीटलच्या चमुतर्फे अग्निहोत्र संस्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना दी पूना गुजराती केळवणी मंडळाचे चेअरमन राजेश शहा म्हणाले की, ज्या ज्या संस्थांवर नितीन देसाई कार्यरत होते, त्या संस्थांवर काम करण्याची संधी नितीन देसाई यांनी मला दिली. लहान भावाप्रमाणे त्यांनी मला वागवले. माझ्या प्रत्येक प्रस्तावाला त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांचे प्रोत्साहन आणि सहकार्यामुळेच अनेक प्रकल्प सिध्दीस गेले. प्रत्येक प्रकल्पावर त्यांचे बारकाईने लक्ष असे. त्या प्रकल्पाशी संबंधित घडामोडी आणि प्रगती जाणून घेत त्यांच्या अनुभवी नजरेतून ते योग्य त्या सूचना देखील करायचे. नितीन देसाई यांच्या निधनामुळे अनेक संस्था आणि गुजराती समाज पोरका झाला असल्याची भावना, डॉ. राजेश शहा यांनी सद्गतीत होऊन सांगितले.
यावेळी बोलताना श्री पूना गुजराथी बंधू समाजचे कार्यकारी विश्वस्त नैनेश नंदू म्हणाले की, नितीन देसाई हे केवळ उद्योजक नव्हते तर सामाजिक भान जपणारे आणि प्रत्यक्ष कृतीतून समाजाला मदत करणारे व्यक्तीमत्व होते. शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात समाजाने प्रगती करावी, असाच दृष्टीकोन त्यांनी कायम बाळगला.
यावेळी बोलताना एच.व्ही. देसाई आय हॉस्पीटलचे वैद्यकीय संचालक डॉ. राहुल देशपांडे म्हणाले की, गेल्या ३० वर्षांपासून नितीन देसाई स्वतः रुग्णालयाच्या कामात सक्रीय होते. नेत्रदान चळवळीपासून मोतीबिंदूच्या लाखो मोफत शस्त्रक्रिया नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखाली झाल्या. अंध मुलींबाबत त्यांच्या मनात कणव आणि ममत्व होते. ग्रामीण भागातील अंध मुली आणि तिरळेपणाने त्रस्त मुलींच्या शस्त्रक्रीया करण्यावर त्यांचा विशेष भर होता. दृष्टीशी संबंधित अनेक समस्या बऱ्या होऊ शकणाऱ्या असतात. मात्र, माहिती आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या अभावामुळे मनुष्य जीवनभर दृष्टीला मुकतो, या वास्तवामुळे नितीन देसाई व्यथित व्हायचे. त्यामुळेच अंधत्व आणि तिरळेपणा या समस्यांबाबत ते कायम जागरूक होते.
यावेळी बोलताना ए.व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव म्हणाले की, नितीन देसाई यांच्या मनात गरिबांविषयी सदैव करूणाभाव असायचा. कोणत्याही सामाजिक किंवा शैक्षणिक उपक्रमात त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्यांच्या जाण्याने कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.
यावेळी बोलताना जनसेवा फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विनोद शहा म्हणाले की, जनसेवा फौंडेशनशी नितीन देसाई गेल्या ३० वर्षांपासून संबंधित होते. ज्येष्ठांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे, या भावनेतून त्यांनी कायमच माझ्या कार्याला सक्रिय पाठिंबा दिला. कोणत्याही प्रकल्प साकारताना येणाऱ्या आर्थिक अडचणींमध्ये नितीन देसाई कायमच खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या सहकार्यामुळेच मी ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करू शकलो.
यावेळी बोलताना पुण्यभूषण फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई म्हणाले की, १९८० नंतरच्या माझ्या सार्वजनिक जीवनात नगरसेवक म्हणून मी काम करीत असताना दारूवाला पुलाच्या अलीकडे देसाई बिडीवाले नावाची एक व्यापारी पेढी आहे आणि नितीन देसाई हे व्यापारी दिवसभर तिथे असायचे असे मला माहित होते. नितीन देसाई यांच्याशी परिचय झाल्यानंतर महाबळेश्वर येथील त्यांच्या बंगल्यावर समाज जीवनाला शिस्त लावून दिशा देण्याच्या दृष्टीने माझ्यासह अनेक जण विचारमंथन करण्यासाठी जमत होतो. नितीन देसाई यांच्याबरोबरची मैत्री दृढ झाल्यानंतर नितीन देसाई म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर संस्था आहेत, असे माझ्या लक्षात आले. मानवी जीवनाच्या मर्यादा लक्षात घेता, त्या मर्यादित काळात एखादी व्यक्ती किती मोठे काम करू शकते आणि एवढे मोठे काम उभे करूनही आपल्यातील नम्रता कशी टिकवून ठेवू शकतो, याचे नितीन देसाई हे मूर्तीमंत उदाहरण आहे. आमच्या पुण्यभूषण फौंडेशनचा २०२३ चा पुण्यभूषण पुरस्कार नितीन देसाई यांना देता आला, याचा आनंद वाटतो.
यावेळी बोलताना डॉ. चंद्रकांत रावळ म्हणाले की, नितीन देसाई हे माझ्यासाठी फ्रेंड, फिलासॉफर आणि गाईड होते. अनेक संस्थांना त्यांचे मार्गदर्शन लाभल्याने त्या संस्थांनी प्रगतीची शिखरे गाठली. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा यांसह अनेक राज्यांमध्ये त्यांनी कायम मदत केली. ते पर्यावरण प्रेमी होते. त्यांचे दातृत्व सजग होते. दिलेल्या मदतीचे नक्की काय सकारात्मक परिणाम आणि बदल होत आहेत, याची माहिती ते सातत्याने घेत असत. ज्या संस्थांशी ते संबंधित होते, त्यांना कायम दोन पावले पुढे जाऊन मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता.
यावेळी नितीन देसाई यांची नातवंडे इलिना राजन नवानी, आरूषा राजन नवानी आणि रियान जय पारीख यांनी मनोगताव्दारे नितीन देसाई यांना आदरांजली वाहिली.
यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवारांसह अनेक संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी नितीन देसाई यांना शब्दसुमने अर्पण केली. यावेळी विविध संस्थांचे सदस्य आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.