चाकोरीच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा विचार करणे आवश्यक – नितीनभाई देसाई, प्रेसिडेंट, दी पूना गुजराथी केळवणी मंडळ !

पुणे, समाजाच्या सर्व स्तरांमध्ये फार गतीने बदल घडून येत आहेत. त्या बदलांच्या अनुषंगाने नवीन समस्यांना सामोरे जावे लागत असून नवीन संधी देखील निर्माण होत आहेत. त्या समस्यांवर तोडगा काढून संधींचा फायदा घेण्यासाठी चाकोरीच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा विचार करणे आवश्यक आहे, असे मत दी पूना गुजराथी केळवणी मंडळाचे प्रेसिडेंट आणि प्रसिध्द उद्योजक नितीनभाई देसाई यांनी व्यक्त केले. दी पूना गुजराथी केळवणी मंडळाच्या शताब्दी महोत्सवाचा प्रारंभ आज नितीनभाई देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दी पूना गुजराथी केळवणी मंडळाचे चेअरमन राजेशभाई शहा, व्हाईस चेअरमन जनकभाई शहा, विश्वस्त मोहनभाई गुजराथी, विश्वस्त जितेंद्रभाई मेहता, विश्वस्त किरीटभाई शहा, सचिव हेमंतभाई मणियार,  सहसचिव विनोदभाई देडीया, सहसचिव संदीपभाई शहा, खजिनदार महेशभाई धारोड, सहसचिव दिलीपभाई जागड आणि सहसचिव प्रमोदभाई शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना नितीन देसाई म्हणाले की, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवादाची दरी दिवसागणिक वाढत असून ती दरी कमी करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये एक संवादसेतू उभा राहिला पाहिजे. पारंपारिक शिक्षणाचे बोट न सोडता आधुनिकतेची कास धरत शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांशी वैयक्तिक नाते दृढ करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची कौशल्ये आणि क्षमता ओळखून अनुबंध निर्माण करीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर भर दिला पाहिजे. संस्थेच्या नावात असलेल्या केळवणी या शब्दाचा अर्थ शिक्षण अधिक संवाद असा होतो. विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव किंवा ताण निर्माण न होऊ देता त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देता आला पाहिजे.

यावेळी बोलताना श्री पूना गुजराथी केळवणी मंडळाचे विश्वस्त मोहन गुजराथी म्हणाले की, संस्थेची शताब्दी हा केवळ एक टप्पा असून आगामी शतकाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आपले हे पहिले पाऊल आहे. या टप्प्यावर भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने चिंतन आणि सिंहावलोकन होणे आवश्यक आहे. गेल्या शंभर वर्षात संस्थेने केलेल्या कार्याच्या आढावा घेत शंभर वर्ष पूर्ण केलेल्या इतर शिक्षण संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन तिथे राबविण्यात येणाऱ्या आधुनिक उपक्रमांची अंमलबजावणी आपल्या संस्थेत करणे आवश्यक आहे. केवळ अर्थार्जनापुरती सक्षम पिढी न घडवता जगण्याचा एक नवीन दृष्टीकोन देणारे शिक्षण तसेच जीवनदायी शिक्षण देणे आवश्यक आहे. उद्याचा जबाबदार नागरिक घडविण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी कार्यरत राहिले पाहिजे. संस्थेने भविष्याचा विचार करता एक थिंक टँक समुह  निर्माण करून त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

यावेळी एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र गुरव, दी पूना गुजराथी केळवणी मंडळाचे सहसचिव प्रमोदभाई शहा, दी पूना गुजराथी केळवणी मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता भिडे आणि अर्चना धारू आदींनी मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पूना गुजराथी केळवणी मंडळाचे चेअरमन राजेश शहा यांनी केले.

सूत्रसंचालन अनुजा सेलोत यांनी केले. जनक शहा यांनी आभार मानले. 

 

 

Leave a Comment