पुणे, आपल्या आगम शास्त्रांत स्पष्ट सांगितले आहे की – “अहिंसा सर्व धर्मांचा शिरोमणी धर्म आहे.”
कारण हिंसा ही सर्व दु:खांची मूळ आहे आणि अहिंसा ही सर्व सुखांची, शांतीची व मोक्षाची जननी आहे.
अहिंसा म्हणजे फक्त प्राणी न मारणे एवढेच नव्हे तर मन, वचन आणि काया यांनी कुणालाही दुखावू न देणे.
• मनात द्वेष ठेवला तरी तो हिंसेचाच एक प्रकार आहे.
• कटू वचन बोलले तरी ते जिभेची हिंसा आहे.
• हात, शस्त्र किंवा साधनांनी केलेली हानी ही देहाची हिंसा आहे.
म्हणून अहिंसा ही केवळ बाह्य आचरण नसून अंतःकरणाची निर्मळता आहे.
भगवान महावीरांनी संपूर्ण आयुष्यभर अहिंसेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवला. त्यांनी सांगितले की –
“जशी स्वतःला वेदना होऊ नये अशी इच्छा आहे, तशीच इतर जीवांनाही आहे. त्यामुळे कुणाच्याही जीवाला दु:ख देऊ नका.” हा संदेश केवळ जैन समाजापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी आहे.
आजच्या समाजात द्वेष, हिंसा, लोभ, स्वार्थ यामुळे तणाव वाढत आहे. जर प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात थोडी का होईना अहिंसेची साधना केली तर –
• घरांत शांतता राहील
• समाजात सौहार्द निर्माण होईल
• राष्ट्रात एकात्मता टिकेल
अहिंसा केवळ ग्रंथात नाही तर वर्तनात आणली पाहिजे.
• आहारात संयम (सात्विक व निरामिष भोजन)
• व्यवहारात प्रेमभाव
• विचारांत करुणा व क्षमा
हे जोपासले तरच आपण खऱ्या अर्थाने अहिंसा धर्माचे अनुयायी ठरू. अहिंसा ही फक्त जैन धर्माची ओळख नाही तर ती मानवतेची खरी ओळख आहे.
जगात खरी शांती, प्रेम आणि बंधुभाव नांदावा असे जर आपल्याला वाटत असेल तर प्रत्येकाने आपल्या मन, वचन, काया यांतून अहिंसेचा मार्ग स्वीकारला पाहिजे.
आपण सारे मिळून प्रार्थना करूया –
“सर्वे भवंतु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यंतु, मा कश्चिद् दुःखभाग् भवेत्॥”