एकता म्हणजेच साधना, एकता म्हणजेच आराधना – प. पू .श्री मुकेश मुनीजी म. सा. !

जिथे एकता आहे, तिथे शक्ती आहे. आणि जिथे विघटन आहे, तिथे विनाश अटळ आहे.

जैन धर्मामध्ये “समवसरण” हे संगठनाचे सर्वोच्च उदाहरण मानले जाते. भगवान महावीराने जेव्हा केवलज्ञान प्राप्त केले, तेव्हा देव, मनुष्य आणि तिर्यंचसुद्धा त्यांच्या प्रवचनासाठी समवसरणात एकत्र येत असत. समवसरणात कोणतीही जात, वर्ण, पद, प्रतिष्ठा यांचा भेद नव्हता — सर्वजण एकाच मंडपात, समान रीतीने, धर्मश्रवणासाठी एकवटत. हीच खरी एकता आहे.

भगवान महावीरांनी सांगितले —
“संघे शक्तिः कलौ युगे” — म्हणजेच कलियुगात संघातच शक्ती आहे.

तप, संयम, साधना यांची खरी फलश्रुती तेव्हाच मिळते, जेव्हा साधू-साध्वीजिनि, श्रावक-श्राविका परस्परात एकात्मता ठेवतात. आपण जर एकमेकांमध्ये द्वेष, स्पर्धा, मत्सर ठेवला, तर साधनेचा मार्ग दुर्बळ होतो.

एकता म्हणजे मतभेद नसणे नव्हे, तर मतभेद असूनही मनभेद न ठेवणे. एकता म्हणजे आपल्या वैयक्तिक अभिमानापेक्षा सामूहिक हित मोठं मानणं. एकता म्हणजे दुसऱ्याच्या यशात आपल्या पराभवाची भावना न ठेवता, सहकार्याची भावना ठेवणे.

आज आपल्या समाजाला, आपल्या संघाला, आपल्या परिवाराला सर्वांत जास्त गरज आहे तर ती संघबद्धतेची.

माणसं वाढली आहेत, पण मनं लहान झाली आहेत. ज्ञान वाढलं आहे, पण सहकार्याची भावना कमी झाली आहे.

जर आपल्याला खरोखर धर्माचं कल्याण करायचं असेल, संघाची प्रगती करायची असेल, तर प्रत्येकाने एकत्र चालायला हवं, भेदभाव न ठेवता, एकमेकांना उचलत पुढे जायचं आहे.

आपल्याकडे जर संघ नाही, तर शक्ती नाही. शक्ती नसेल, तर साधना नाही. आणि साधना नसेल, तर मोक्षाचा मार्गही बंद होतो.

म्हणूनच, संघाचा आदर करा, एकतेला प्राधान्य द्या, आणि भगवान महावीरांच्या “अनेकांतवाद” तत्त्वज्ञानातून सहिष्णुता आणि समन्वय शिकून आचरणात आणा

Leave a Comment