श्री गोदम्बाजी–रंगनाथजी विवाह सोहळा उत्साहात संपन्न

पुणे : धनुर्मासाच्या पवित्र निमित्ताने माँ आशापुरा माता मंदिर, गंगाधाम चौक, पुणे येथे श्री गोदम्बाजी–रंगनाथजी यांचा विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. हा दोन दिवसीय धार्मिक सोहळा १० व ११ जानेवारी रोजी पारंपरिक विधींसह संपन्न झाला.शनिवारी हळदी, मेहंदी व संगीताचा कार्यक्रम पार पडला, तर रविवारी विधिवत विवाह सोहळा पार पडला.

धनुर्मास हा भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळविण्याचा अत्यंत शुभ काळ मानला जातो. पौराणिक कथेनुसार माता गोदादेवीने भगवान विष्णूंना पतीरूपात प्राप्त करण्यासाठी २७ दिवस उपवास, भजन-कीर्तन व तपश्चर्या केली. तिच्या अखंड भक्तीने प्रसन्न होऊन धनुर्मासाच्या २७व्या दिवशी भगवान विष्णूंनी गोदादेवीशी विवाह केला, अशी श्रद्धा आहे.या पार्श्वभूमीवर देशातील विविध भागांमध्ये श्री गोदम्बाजी–रंगनाथजी विवाह सोहळा श्रद्धेने साजरा केला जातो.

भाविक पहाटे उठून प्रार्थना, विष्णु सहस्त्रनाम पठण व विधिवत पूजन करतात. भगवान विष्णूंसह गोदादेवीचीही विशेष पूजा केली जाते. धनुर्मासात गोदा–रंगनाथ कल्याण उत्सवाला विशेष महत्त्व आहे.माँ आशापुरा माता मंदिरात गेल्या एक महिन्यापासून हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येत असून, भक्त व मंदिराच्या वतीने दररोज सकाळी भावपूर्ण भजन तसेच प्रसादीचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.माँ आशापुरा माता मंदिरात झालेल्या या विवाह सोहळ्यात वर पक्षाकडून राजेशजी जागृतिजी सोनी परिवार, तर वधू पक्षाकडून राजेशजी जसवंतीबेन मेहता परिवार सहभागी झाले होते. ट्रस्टच्या वतीने भारती भंडारी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.विवाह सोहळ्यानिमित्त सनई-चौघडे, ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. मंदिर परिसर फुलांनी आकर्षकपणे सजवण्यात आला होता. या प्रसंगी विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा व मंगलकार्ये पार पडली.

धनुर्मास काळात गेल्या ३० दिवसांपासून दररोज सकाळी भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिलीप मुनोत, श्याम खंडेलवाल, राजेंद्र गोयल, मंगेश कटारिया यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे हा विवाह सोहळा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Leave a Comment