(नामको हॉस्पिटलच्या भेटीत प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी रुग्णांना दिले बळ)
नाशिक – आजार झाल्याचे स्विकारलेच नाही तर, शरीर उपचारांना प्रतिसादच देणार नाही. म्हणून आजार झाला तर आधी तो स्विकारा म्हणजे त्यावर मात करण्याची मानसिकता तयार होते. मी स्वतःदेखील आजार स्विकारला म्हणून व्याधीमुक्त झालो, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते तथा कॅन्सरवर यशस्वी मात केलेल्या शरद पोंक्षे यांनी रुग्णांना जगण्याचे बळ दिले.
स्वा. सावरकर जयंतीच्या पूर्वसंध्येला पोंक्षे यांनी शहरातील पेठरोडवरील नामको हॉस्पिटलला भेट देत येथील सुविधांसह विविध योजनांची माहिती घेत समाधान व्यक्ती केले. तसेच, कॅन्सरग्रस्त रुग्णांशीही त्यांनी संवाद साधला. या भेटीप्रसंगी नामको हॉस्पिटलचे सीईओ डॉ. लक्ष्मीकांत पाठक यांनी संस्थेची माहिती दिली. तर, विश्वस्त जयप्रकाश जातेगावकर यांनी उपलब्ध सुविधांबद्दल माहिती दिली. यावेळी जनरल मॅनेजर (अॅडमिन) समीर तुळजापूरकर, विश्वस्त चंद्रकांत पारख, राहुल देढिया-जैन आदी उपस्थित होते. यावेळी रुग्णांशी संवाद साधताना पोंक्षे पुढे यांनी आजारपणातील आपले अनुभव सांगितले. ते म्हणाले की, मला रोज संध्याकाळी ताप यायचा. मग कॅन्सरचे निदान झाले. कंबरेच्या भागात गाठी तयार होऊन हा कॅन्सर झाला. याचदरम्यान मी सोनाली बेंद्रे, इरफान खान यांच्या बातम्या वाचत होतो. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट बघत होतो. मात्र, मला आजाराचे भांडवल करायचे नव्हते. सहानुभूतीही नको होती. म्हणून मी अलिप्त राहिलो. आजार झाला आहे हे स्विकारले. संयमाने दीड वर्षे ओषधोपचार, किमोथेरेपी घेतल्यानंतर या आजारातून मी पूर्ण बरा झालो आणि आता तुमच्यासमोर उभा आहे, असेही त्यांनी सांगितले. कॅन्सर किंवा इतर कोणतीही दुर्धर व्याधी ही तुमच्या आयुष्यातील एक रात्र समजा. कारण, रात्रीनंतर सूर्योदय असतो. हीच आस तुम्हाला जगण्याचे बळ देते. माझ्यासाठी ही रात्र १२ महिन्यांची होती. अशावेळी अत्यंत खंबीरपणे, धिराने सामोरे जायचे असते, असे सांगतानाच उद्याचा सूर्य पाहण्याच्या आशेने जगण्याचाही त्यांनी दिला. यावेळी जातेगावकर यांनी संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करत पोंक्षे यांचे आभार मानले.
वैद्यकीय शिक्षणाला मराठीचा पर्याय हवा