पुणे सकल संघात नव्या कार्यकारिणीची स्थापना; पदाधिकाऱ्यांचा सेवाभावी संकल्प!
पुणे, श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन सकल संघ, पुणे जिल्ह्याच्या नव-निवडीत कार्यकारिणीचा शपथविधी समारंभ सैलिसबरी पार्क येथील महावीर प्रतिष्ठानमध्ये भव्य आणि गरिमामय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास संघाशी संबंधित विविध संस्थांचे पदाधिकारी, समाजातील विविध समस्यांवर कार्य करणारे प्रतिनिधी, वरिष्ठ मार्गदर्शक, माजी पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संगीतकार महेश संचेती यांच्या मंगलाचरण व नवकार मंत्र पठणाने झाली. त्यानंतर नव-निवडीत अध्यक्ष विलास राठोड आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीने विधिवत शपथ घेत समाजसेवा, संघटन बळकटीकरण आणि सामाजिक समन्वयाचा संकल्प केला. उपस्थित वरिष्ठांनी नव्या कार्यकारिणीला मार्गदर्शन करत समाज अधिक संघटित, सक्षम आणि प्रगतिशील करण्याचे आवाहन केले.
नवीन कार्यकारिणीत मार्गदर्शक मंडळामध्ये वरिष्ठ मार्गदर्शक म्हणून प्रकाश धारीवाल, संस्थापक अध्यक्ष म्हणून विजयकांत कोठारी, मार्गदर्शक म्हणून रमणलाल लुंकड तसेच माजी अध्यक्ष म्हणून पोपटलाल ओस्तवाल यांचा समावेश आहे.
कार्यकारिणीत अध्यक्षपदी विलास राठोड, कार्याध्यक्ष म्हणून अनिल नाहर, वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब धोका, तर उपाध्यक्षपदी अशोककुमार पगारिया, गिरीश पारख आणि सतीश सुराणा यांची निवड करण्यात आली आहे.
महामंत्री म्हणून सागर सांकला, सहमंत्री म्हणून नितीन बेदमुथा आणि माणिक दुगड, कोषाध्यक्ष म्हणून प्रमोद लुंकड तसेच प्रसिद्धी प्रमुख म्हणून अभिजीत डुंगरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच कार्यकारिणी सदस्यांमध्ये शांतिलाल बोरा, सुभाष ललवाणी, आदेश खिंवसरा, प्रकाश बोरा, राजेंद्र मुनोत, प्रवीण सोळंकी, राजेंद्र गोठी, नंदकुमार लुणावत, दीपक कर्नावट, विलास भळगट, सागर बलदोटा, नितीन बांठिया, मनोज पोखरना, मनोज भंडारी आणि सुरेश गांधी यांचा समावेश आहे.
समारंभाच्या शेवटी गौतम प्रसादीचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित सर्वांनी त्याचा लाभ घेत नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.
“नवी कार्यकारिणी केवळ पदभार स्वीकारत नाही, तर ती समाजाप्रती सेवा, समर्पण आणि संस्कार पुढे नेण्याचा संकल्प करत आहे. आजच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेणे आणि संघटन अधिक मजबूत करणे ही गरज आहे. समन्वय आणि सकारात्मक दृष्टिकोनातून कार्य केल्यास समाज निश्चितच नव्या उंचीवर पोहोचेल,” असे शांतिलाल मुथा यांनी सांगितले.
“हा प्रसंग जबाबदारीचा असून प्रत्येक पदाधिकाऱ्याने पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि टीमवर्कच्या भावनेतून काम करणे आवश्यक आहे. नव्या कार्यकारिणीसमोर समाजाला नवी दिशा देण्याची मोठी संधी आहे. युवकांना सोबत घेत आधुनिक विचार आणि परंपरेचा समतोल राखत कार्य केल्यास संघाची प्रगती अधिक वेगाने होईल,” असे प्रकाश धारीवाल यांनी नमूद केले.
“समाजाची खरी ताकद ही त्याच्या एकजुटीत आणि परस्पर विश्वासात आहे. सर्व पदाधिकारी एकत्रितपणे समर्पित भावनेने कार्य केल्यास कोणतेही उद्दिष्ट अवघड राहत नाही. नव्या कार्यकारिणीकडून अपेक्षा आहे की ती समाजातील सर्व घटकांना जोडत विकासाचे नवे आयाम निर्माण करेल,” असे प्रकाश पारख यांनी सांगितले.