पर्युषण पर्वानिमित्त भगवान महावीरांच्या पाच पाळण्या’च्या दर्शनाची संधी

पुणे : जैन समाजाचा प्रमुख धार्मिक उत्सव असलेल्या पर्युषण पर्वानिमित्त पुण्यातील भाविकांना भगवान महावीर यांच्या पाच पाळण्यांचे एकत्र दर्शन घेण्याची अनोखी संधी मिळणार आहे. सुजय गार्डन येथील जयंत शहा यांच्या निवासस्थानी २६ आणि २७ ऑगस्ट रोजी पाळणे दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत.

पर्युषण पर्वाच्या पाचव्या दिवशी भगवान महावीरांचा जन्मोत्सव सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी मंदिरातील भगवान महावीरांचे पाळणे सजवून भाविक दर्शनासाठी घरी घेऊन जातात. यंदा श्री गोडजी मंदिर, कात्रज मंदिर, सुजय गार्डन मंदिर, लेक टाऊन मंदिर आणि पद्मावती नगर मंदिर येथील पाळणे एकत्र आणून दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत.

२०१५ साली सात पाळण्यांचे असेच एकत्र दर्शन घडले होते. यंदा पुन्हा अशाच पद्धतीने २५, २६ आणि २७ ऑगस्ट रोजी पाच पाळण्यांचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कालावधीत धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आली असून त्यात भजन, भावगीते, तसेच आचार्य आणि गुरु महाराजांचे प्रवचन यांचा समावेश आहे.

दर्शनासाठी सर्व भाविकांना आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती जयराज ग्रुपचे संचालक राजेश शहा यांनी दिली. त्यांनी सांगितले की, “भगवान महावीर जयंती आणि पाळणे याला जैन समाजात विशेष धार्मिक महत्त्व आहे. भाविकांना एकाच ठिकाणी अनेक मंदिरांतील पाळण्यांचे दर्शन घेता येईल. हा उपक्रम भाविकांसाठी आध्यात्मिक समाधान देणारा ठरेल.”

Leave a Comment