क्षमा : आत्मशुद्धीचा मार्ग मिच्छामि दुक्कडम् – प. पू. श्री मुकेश मुनीजी म. सा. !

पुणे (बिबवेवाडी जैन स्थानक), आपल्या जीवनात अनेक गोष्टी घडतात. कधी आपल्याकडून कळत-नकळत चुका होतात, कधी आपल्या बोलण्याने किंवा कृतीमुळे दुसऱ्याला दु:ख होते. अशावेळी आपल्या मनावर एक प्रकारचा भार येतो. हा भार दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे क्षमा आणि क्षमायाचना.

क्षमा म्हणजे केवळ ‘सोडून देणे’ नव्हे. क्षमा म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीबद्दल मनात कोणताही राग, द्वेष किंवा सूडाची भावना न ठेवता, त्याला मानसिक आणि भावनिक स्तरावर पूर्णपणे माफ करणे. जेव्हा आपण एखाद्याला क्षमा करतो, तेव्हा आपण त्याच्यावर उपकार करत नाही, तर आपल्याच मनाला त्या नकारात्मक भावनांच्या कैदेतून मुक्त करतो. क्षमा हा दुसऱ्यासाठी नसून, आपल्या आत्म्याच्या शुद्धीसाठी आहे. हे एक असे अमृत आहे जे मनाला शांत आणि पवित्र बनवते.
क्षमायाचना म्हणजे आपली चूक स्वीकारून नम्रतेने माफी मागणे. हा क्षमेपेक्षाही कठीण मार्ग आहे. जेव्हा आपण ‘माफ करा’ म्हणतो, तेव्हा आपण आपले अहंकार आणि मोठेपण बाजूला ठेवतो. जैन धर्मामध्ये ‘मिच्छामि दुक्कडम्’ (Micchami Dukkadam) ही एक अतिशय शक्तिशाली प्रार्थना आहे.

‘माझ्याकडून जे काही चुकीचे घडले आहे, ते सर्व निष्फळ होवो’ असा त्याचा अर्थ आहे. या एका वाक्यात केवळ माफीच नाही, तर आपल्या चुकीची जाणीव आणि ती पुन्हा न करण्याची प्रतिज्ञा दडलेली आहे.

दुर्बल माणूस प्रतिकार करू शकत नाही म्हणून तो शांत बसतो. ती मजबूरी आहे, क्षमा नाही. परंतु ज्याच्याकडे शक्ती आहे, सामर्थ्य आहे, प्रतिकार करण्याची क्षमता आहे – आणि तरीही तो अहिंसेचा, क्षमेचा मार्ग निवडतो – त्याची क्षमा हाच खरा “वीरांचा अलंकार” आहे.

“क्षमा विरस्स भूषणम्” म्हणजेच – दुर्बलांचा नाही, तर पराक्रमी, बलवान, सामर्थ्यवान व्यक्तींचाच खरा अलंकार म्हणजे क्षमा.

चांडकौशिक नागाने विषारी फूत्कार टाकून महावीर स्वामींना जखमी केले, तरीही त्यांनी रागावण्याऐवजी त्याला करुणा दाखवली. हेच “क्षमा विरस्स भूषणम्” चे जिवंत उदाहरण आहे.

एक माणूस कित्येक वर्षांपासून आपल्या शेजाऱ्याचा राग मनात धरून बसला होता. यामुळे त्याचे मन नेहमी अशांत आणि चिंतातुर राहायचे. त्याला शांत झोप लागत नव्हती आणि त्याची तब्येतही बिघडत चालली होती. एकदा त्याला एका संतांनी सांगितले, “तू दुसऱ्याचा द्वेष धरून बसला आहेस, पण त्याचे ओझे मात्र तू एकटाच वाहत आहेस. त्या शेजाऱ्याला क्षमा कर.” त्या माणसाने संतांचे ऐकले आणि मनातल्या मनात त्याला माफ केले. त्या क्षणी त्याला असे वाटले की जणू त्याच्या डोक्यावरून एक मोठे ओझे उतरले आहे. त्याचे मन शांत झाले आणि त्याला आत्मिक शांती मिळाली.

यावरून हेच सिद्ध होते की, क्षमा देणे आणि क्षमा मागणे हे दोन्ही आपल्याच हितासाठी आहेत. क्षमा हीच खरी शांती आहे. क्षमा केल्याने आपले मन हलके होते, आणि क्षमा मागितल्याने आपले अहंकार गळून पडते.

घरात – पती-पत्नी, आई-वडील व मुले यांच्यात छोटे मतभेद होतात. क्षमा नसेल तर राग वाढतो, पण क्षमा असेल तर प्रेम वाढते. समाजात – जात, धर्म, मतभेद विसरून क्षमेने ऐक्य टिकवले जाते. आध्यात्मिक जीवनात – क्षमा हे आत्मशुद्धीचे शस्त्र आहे. पर्युषण पर्वामध्ये प्रत्येक जैन व्यक्ती वर्षातून एकदा आपल्या जवळच्या आणि दूरच्या प्रत्येक व्यक्तीची, अगदी कीटक आणि जीवांचीही क्षमा मागतो. मिच्छामि दुक्कडम् म्हणत असताना आपण केवळ मानवाकडूनच नाही, तर निसर्गातील प्रत्येक कणाकडून क्षमा मागतो. हे आपल्याला शिकवते की आपण कोणत्या परिस्थितीत कोणाला दु:ख दिले आहे, हे आपल्याला आठवत नाही, परंतु आपल्या आत्म्याला त्याची जाणीव असते. म्हणून, आपण सर्वांना क्षमा मागून आत्म्याला शुद्ध करतो.

“क्षमा विरस्स भूषणम्” हे वचन केवळ तत्त्वज्ञान नाही, तर जीवन जगण्याची दिशा आहे. क्षमा ही दुर्बलतेची खूण नाही. क्षमा ही सामर्थ्याची, पराक्रमाची, आणि आत्मबलाची खरी खूण आहे. क्षमा केल्याने हृदय हलके होते. राग, सूड यांचा अंत होतो. क्षमा करणारा अधिक मोठा ठरतो, कारण तो स्वतःवर विजय मिळवतो. क्षमा ही केवळ नैतिकता नाही, तर मोक्षमार्गाचे दार उघडणारे साधन आहे.
जैन धर्मात दरवर्षी क्षमावाणी किंवा क्षमापना साजरी केली जाते. त्या दिवशी आपण सर्व जीवांशी म्हणतो –“मिच्छामि दुक्कडम्” – म्हणजेच, मी जाणीवपूर्वक वा अजाणतेपणी केलेल्या प्रत्येक चुकीबद्दल तुमची क्षमा मागतो. ही परंपरा केवळ औपचारिकता नाही, तर अंतःकरणातील विनम्रता आहे.
यामुळे मन शुद्ध होते, वैर मिटते आणि आत्मा हलका होतो.

क्षमा करणारा स्वतः मोठा ठरतो. जो क्षमा करतो तो स्वतःवर विजय मिळवतो. तलवारीने आपण शत्रूला हरवू शकतो, पण क्षमेने आपण त्याचे हृदय जिंकू शकतो.
आपल्या जीवनात क्षमेचा भाव जोपासूया.
ज्यांनी आपल्याला दुखः दिले त्यांना माफ करूया, आणि आपण ज्या कोणाला दुखावले असेल त्यांची क्षमा मागूया.

Leave a Comment