पुणे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातीवरील टॅरिफमध्ये दिलेल्या सवलतीमुळे भारतीय तांदूळ निर्यात क्षेत्राला मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. भारतावर लागू करण्यात आलेला १८ टक्के टॅरिफ हा पाकिस्तान व थायलंडसारख्या स्पर्धक देशांच्या तुलनेत कमी असल्याने, जागतिक बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मक क्षमता अधिक बळकट होणार आहे, असे मत तांदूळ व्यापारी व आर. एम. डिस्ट्रिब्युटरचे संचालक श्री. राजेंद्र बाठिया यांनी व्यक्त केले.
या निर्णयाचे स्वागत करताना बाठिया म्हणाले,
“अमेरिकेने भारतासाठी टॅरिफ कमी केल्याने तांदूळ निर्यात क्षेत्राला मोठे बळ मिळाले आहे. भारताकडे दर्जेदार तांदूळ, मुबलक साठा आणि सक्षम पुरवठा साखळी आहे. सरकारने निर्यात धोरणात सातत्य ठेवले, तर भारतीय तांदळाला जागतिक बाजारात दीर्घकालीन व स्थिर मागणी निर्माण होईल. याचा थेट फायदा शेतकरी, व्यापारी आणि संपूर्ण कृषी अर्थव्यवस्थेला होणार आहे.”
अमेरिका इतर देशांवरील अवलंबित्व कमी करून भारताला अधिक संधी देण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलत असल्याचेही बाठिया यांनी नमूद केले. या नव्या टॅरिफ धोरणामुळे भारताच्या तांदूळ निर्यातीत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, यापूर्वी टॅरिफ १० टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला असतानाही अमेरिकेला होणारी भारतीय तांदूळ निर्यात वाढली होती. सध्या जागतिक बाजारात भारताचा तांदूळ निर्यातीत सुमारे ४० टक्के वाटा असून, सरकारने दीर्घकालीन व स्थिर निर्यात धोरण स्वीकारल्यास हा वाटा ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. एखाद्या नव्या देशात भारतीय तांदळाचा वापर सुरू झाला की, पुढील वर्षांपासून त्या देशात भारताच्या तांदूळ निर्यातीत सरासरी १० टक्के वार्षिक वाढ होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
टॅरिफ ५० टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारात स्पर्धा करणे अधिक सुलभ होणार आहे. पाकिस्तान आणि थायलंडला सध्या १९ टक्के टॅरिफसह तांदूळ निर्यात करावा लागत असल्याने, अमेरिकन बाजारात त्यांना किमतीच्या बाबतीत भारताशी तीव्र स्पर्धा करावी लागणार आहे.
भारताकडे सध्या सुमारे १४९ दशलक्ष मेट्रिक टनांचे विक्रमी तांदूळ उत्पादन व मोठा साठा उपलब्ध असल्याने चालू निर्यात हंगामात निर्यातदारांकडे पुरेसा माल राहणार आहे. मात्र बासमती तांदळाचे सध्याचे उच्च दर आणि डॉलरमधील चढउतार लक्षात घेता दरांवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचेही बाठिया यांनी सांगितले. परिस्थिती अनुकूल राहिल्यास अमेरिकन बाजारपेठेत भारताला आघाडी घेण्याची मोठी संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.