पुणे, गुरु म्हणजे आत्मोन्नतीचा खरा मार्गदर्शक. गुरुपौर्णिमा हा दिवस केवळ एक उत्सव नसून, आपल्या जीवनात “गुरु” या श्रेष्ठ संकल्पनेचा स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. गुरु म्हणजे केवळ शास्त्र शिकवणारे शिक्षक नव्हे, तर आत्मकल्याणाची वाट दाखवणारे प्रकाशस्तंभ. ज्या गुरुने आत्मा आणि मोक्षमार्ग याबाबत अज्ञानरूपी अंधार दूर केला, अशा गुरूला स्मरण करण्याची ही गुरुपौर्णिमा.
भगवान महावीर स्वामी हे केवळ तीर्थंकर नव्हते तर अनेकांना मोक्षमार्ग दाखवणारे आदर्श गुरु होते. त्यांचे प्रमुख शिष्य गौतमस्वामी यांनी गुरुप्रेम, शरणागती, आणि विनय याचे अद्वितीय उदाहरण जगासमोर ठेवले.
गौतमस्वामी हे एक विद्वान ब्राह्मण होते. प्रारंभी त्यांना आपल्या ज्ञानाचा गर्व होता, पण महावीर स्वामींच्या दर्शनानंतर त्यांना आत्मज्ञानाचा खरा अर्थ समजला. त्यांनी गुरूकडे नतमस्तक होऊन, अहंकार झटकून, आत्मोद्धाराच्या वाटेवर प्रवेश केला.
महावीर स्वामींनीही गौतमस्वामींचा प्रत्येक शंका निरसन करत करत त्यांना मोक्षाच्या अंतिम पायरीपर्यंत पोहचवले. हा संबंध केवळ ज्ञान देणारा गुरु व घेणारा शिष्य असा नव्हता, तर आत्मा जागृत करणारा एक पवित्र बंध होता.
जसे सूर्याशिवाय अंधार दूर होत नाही, तसेच गुरूविना आत्मा उजळत नाही. गुरू हे आत्मोन्नतीसाठी आवश्यक असतात. आज आपल्याला विचार करायला हवा –
• आपला खरा गुरु कोण आहे?
• आपण त्यांच्या उपदेशानुसार जीवन जगतो आहोत का?
• की केवळ नाममात्र विनय दाखवतो?
गुरुपौर्णिमा म्हणजे आत्मचिंतनाचा दिवस –
• आपण गुरूकडून काय घेतलं?
• किती आत्मपरीक्षण केलं?
• आणि अजून किती अंतर बाकी आहे?
जैन परंपरेत आचार्य, उपाध्याय आणि साधु-साध्वी हे देखील गुरूचे रूप आहेत.
त्यांच्याप्रती श्रद्धा, सेवा आणि नम्रता ठेवणे हेच गुरुपौर्णिमेचे खरे पालन होय.
गौतमस्वामींप्रमाणे आपणही आपल्या गुरूंकडे संपूर्ण समर्पणाने व विनयाने वागलो, तर आपले जीवनही मोक्षमार्गावर निघू शकेल. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वांनी ही नितांत पावन नाळ अधिक दृढ करूया.
गुरूंच्या चरणी कोटी कोटी वंदना।