पुणे, नेत्रसेवेच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान येऊनही अंधांची संख्या दुर्दैवाने आजही नियंत्रित नाही. दृष्टीशी संबंधित अनेक समस्या बऱ्या होऊ शकणाऱ्या असतात. मात्र, माहिती आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या अभावामुळे मनुष्य जीवनभर दृष्टीला मुकतो हे खेदजनक आहे. दृष्टीहिनतेच्या समस्येला सामोरे जाणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे, असे मत सिंबायोसीस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठनतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या “पुणे नेत्रसेवा राष्ट्रीय पुरस्कारां”चे वितरण आज सिंबायोसीस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां.ब. मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी डॉ. मुजुमदार बोलत होते.
यावेळी यंदाचा संस्थात्मक पातळीवरील पुरस्कार पुण्यातील पुना ब्लाईंड मेन्स असोसिएशनच्या एच. व्ही. देसाई आय हॉस्पीटलला, तर वैयक्तीक पातळीवरील पुरस्कार मुंबई येथील प्रा. डॉ. अमूल्य साहू यांना देण्यात आला. प्रत्येकी एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि पुणेरी पगडी असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. पुना ब्लाईंड मेन्स असोसिएशनच्या एच. व्ही. देसाई आय हॉस्पीटलचे कार्याध्यक्ष या नात्याने नितीन देसाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
देसाई आय हॉस्पीटलच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन झंवर, चेअरमन डॉ. सतीश देसाई, सचिव डॉ. राजेश पवार, डॉ. संपत पंगुलिया, कर्नल डॉ. मदन देशपांडे, पुना ब्लाईंड मेन्स असोसिएशनच्या एच. व्ही. देसाई आय हॉस्पीटलचे अध्यक्ष डॉ. राजेश शहा आणि परवेझ बिलिमोरीया उपस्थित होते. मॉडर्न कॅफेचे स्व. जी.एम. शेट्टी यांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना डॉ. शां.ब. मुजुमदार म्हणाले की, डोळे हे जगाकडे पाहण्याची खिडकी असून मानवी उत्कट भावभावनांचे निदर्शक आहे. राग, प्रेम, वात्सल्य या सगळ्या भावनांचे प्रतिबिंब डोळ्यात उमटत असते. डोळ्यात उमटणाऱ्या या भावभावनांमुळे व्यक्तिमत्वाचा देखील अंदाज बांधता येतो, इतके डोळे महत्त्वाचे आहेत. जगात आजही सुमारे चार कोटींच्यावर अंध व्यक्ती असून भारतात देखील सुमारे ९० हजारांवर अंध व्यक्ती असल्याचे आकडेवारींवरून स्पष्ट होते. हे चित्र वेदनादायी आहे. अंधत्वामुळे परावलंबित्व येत असले तरी ती व्यक्ती दुर्बल असते असे नाही, तर अंध असूनही यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केल्याची उदाहरणे समाजात दिसून येतात. अंधत्वामुळे आपल्या क्षमतांवर मर्यादा येतात, हे अर्धसत्य असून अंध असलेल्या हेलन केलर यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अनेकांचे जीवन उजळले आहे. अनेक लोकांना डोळे असतात, पण दृष्टीकोन नसतो. मात्र, काहींना अंध असूनही दृष्टीकोन असल्यामुळे ते समाजात आदर्श निर्माण करतात. अंधत्वाबरोबर तिरळेपणा ही समस्या देखील प्रकर्षाने पुढे येत असून छोट्या शस्त्रक्रियेने या समस्येपासून मुक्तता मिळू शकते.
यावेळी बोलताना डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले की, आजही नेत्रदानाविषयी समाजात पुरेशी सजगता आणि जागरूकता नसल्याने देवाने दिलेली डोळे ही अनमोल देणगी मातीमोल ठरत आहे. स्वयंसेवी संस्था तसेच पुना ब्लाईंड मेन्स असोसिएशन आणि एच. व्ही. देसाई आय हॉस्पीटलसारख्या संस्थांनी नेत्रदानाविषयी समाजात जागृकता निर्माण करणे आवश्यक आहे.
यावेळी पुरस्कारार्थी पुना ब्लाईंड मेन्स असोसिएशनच्या एच. व्ही. देसाई आय हॉस्पीटलचे कार्याध्यक्ष नितीन देसाई आणि प्रा. डॉ. अमूल्य साहू यांनी मनोगत व्यक्त केले. परवेझ बिलिमोरीया यांनी पुना ब्लाईंड मेन्स असोसिएशनच्या एच. व्ही. देसाई आय हॉस्पीटलच्या कार्याविषयी माहिती दिली.
यावेळी पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन झंवर यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन डॉ. सतीश देसाई यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद खडके यांनी केले. तर सुनील भुजबळ यांनी आभार मानले.