भावप्रधान भक्ती हीच मोक्षाची खरी वाट – प. पू. श्री मुकेश मुनीजी म. सा. !

पुणे, जैनधर्म हा आत्मशुद्धीचा आणि मोक्षमार्गाचा धर्म आहे. ह्या मार्गावर भक्ती, ज्ञान आणि आचरण यांचे समान महत्त्व आहे. परंतु “भक्ती” या शब्दाचा अर्थ बहुतेक वेळा केवळ देवपूजेशी, मूर्तीपाठाशी किंवा कर्मकांडाशी जोडला जातो. जैन तत्त्वज्ञान हे भक्तीचा अर्थ अत्यंत खोल आणि सूक्ष्म पद्धतीने समजावतो – भक्ती ही केवळ रूप, रंग, वर्ण, जात, कुल, ज्ञान किंवा बाह्याचार यावर आधारित नसते, ती असते “शुद्ध भावावर”.

 

भगवंतांनी कधीही हे पाहिलं नाही की भक्त कोणत्या जातीचा आहे, त्याचं शिक्षण काय आहे, त्याचा समाजात दर्जा काय आहे; ते नेहमी पाहतात तर भक्ताच्या अंतःकरणातील “भाव” – हाच भक्तीचा खरा केंद्रबिंदू आहे. भक्ती करण्यासाठी ना मंदिर लागतं, ना विशेष पोशाख, ना विशिष्ट जातीचं प्रमाणपत्र – लागतो तो “भाव”. याच भावभक्तीची उदाहरणं आपल्या शास्त्रांमध्ये भरपूर सापडतात –

• श्रीराम आणि हनुमानजी – हनुमानजी हे वानर योद्धा होते. ना त्यांनी वेदांचा अभ्यास केला होता, ना शास्त्रशुद्ध मंत्र उच्चारायची योग्यता होती. पण त्यांच्या हृदयात रामप्रेम इतकं गहिरं होतं की प्रभु श्रीराम म्हणाले – “हनुमान तू माझा सर्वस्व आहेस.”
भगवान श्रीरामांनी हनुमानाला अजर-अमर केलं कारण त्यांच्या भक्तीमध्ये अहं नव्हता, शंका नव्हती, केवळ निस्सीम समर्पण होतं.

• श्रीकृष्ण आणि मीराबाई – मीरा एक राजघराण्यातील स्त्री होती. परंतु तिनं सर्व सांसारिक बंधने तोडून प्रभु श्रीकृष्णाला आपल्या जीवनाचा ध्येय मानलं. समाजाच्या विरोधात जाऊनही तिची भक्ती डगमगली नाही.
मीरेचा कृष्णावर विश्वास इतका गहिरा होता की ती म्हणायची – “मेरे तो गिरधर गोपाल दुसरो न कोई.”
जन्म, लिंग, समाज, पद – काहीही तिच्या भक्तीसमोर अडथळा ठरला नाही.

• अर्जुनमाली – अर्जुनमाली हा एक हिंस्र डाकू होता. त्याने अनेकांना लुटलं, मारलं, परंतु जेव्हा त्याच्या जीवनात गुरूचा प्रकाश आला, तेव्हा तो पूर्णतः बदलला. त्यानं पश्चात्तापपूर्वक आपलं जीवन प्रभू चरणी समर्पित केलं.

हे उदाहरण आपल्याला शिकवतं की भक्तीला पूर्वाश्रमीचा काही संबंध नसतो. अंतःकरणात परिवर्तन झालं, की प्रत्येक जिव आत्मिक मार्गावर चालू शकतो.

• भगवान महावीर आणि चंदनबाला – चंदनबाला ही एक दासी, कैदी स्त्री होती. परंतु तिने संपूर्ण श्रद्धेने आणि भावपूर्वक भगवान महावीरांना अन्नदान केलं, आणि ती प्रथम श्राविका झाली जिने पूर्ण पंचमहाव्रत स्वीकारले.

“न जातिः न वर्णः न कुलं न लिंगम्।
भक्तिम् विशुद्धां परमं प्रमाणम्॥”
(ना जात, ना वर्ण, ना कुल, ना लिंग – केवळ शुद्ध भक्ती हेच अंतिम प्रमाण आहे.)

भक्तीमध्ये कोणताही अभिमान नाही, तुलना नाही – फक्त आत्मप्रेम आणि गुरू, देव, धर्मावरील पूर्ण विश्वास असतो.
यासाठी श्रीमद् राजचंद्रजी म्हणतात –
“भावहीन क्रिया जरी करितो तू,
संपत्तिच्या राशीतही गरीब आहेस तू.”
आपणही या चातुर्मासात जात, वर्ण, वंश, शिक्षण, प्रतिष्ठा विसरून, फक्त शुद्ध भावाने आत्मकल्याणाच्या दिशेने भक्ती करावी.

Leave a Comment