आज व उद्या पुणे मार्केट यार्डमधील गूळ–भुसार बाजार बंद !

पुणे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाची घटना अत्यंत दुःखद व वेदनादायक असून, या घटनेमुळे पुण्यातील व्यापारी वर्ग शोकाकूल झाला आहे.
या पार्श्वभूमीवर दि पूना मर्चंट्स चेंबर, हमाल पंचायत व ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्या संयुक्त निर्णयानुसार आज बुधवारी, दि. २८ जानेवारी आणि उद्या गुरुवार, दि. २९ जानेवारी २०२६ रोजी पुणे मार्केट यार्डमधील संपूर्ण गूळ–भुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बठिया यांनी दिली.

मा. अजितदादा पवार यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात व्यापारी समाजाच्या प्रश्नांकडे नेहमीच सकारात्मक व संवेदनशील दृष्टीकोनातून पाहिले. करप्रणाली, बाजारपेठेतील अडचणी, परवाने, वाहतूक व साठवणूक यांसारख्या विविध मुद्द्यांवर व्यापारी संघटनांनी मांडलेल्या समस्यांची त्यांनी वेळोवेळी दखल घेतली. व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत, असेही बठिया यांनी सांगितले.
विशेषतः अडचणीच्या काळात दि पूना मर्चंट्स चेंबरसह विविध व्यापारी संघटनांशी त्यांनी सातत्याने संवाद राखला होता. गेल्या वर्षी दिवाळीच्या निमित्ताने चेंबरच्या लाडू–चिवडा उपक्रमाला भेट देत त्यांनी चेंबरच्या कार्याचे भरभरून कौतुक केले होते, असेही बठिया यांनी आठवणीने सांगितले.
या दुःखद प्रसंगी दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे मा. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात येत असून, ठेवण्यात आलेला बाजार बंद हा व्यापारी समाजाच्या संवेदशील भावना व्यक्त करणारा निर्णय असल्याचे अध्यक्ष राजेंद्र बठिया यांनी स्पष्ट केले आहे.
-दि पूना मर्चंट्स चेंबर, पुणे