विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवी  जीवनाचा पाया – डॉ. अरूणकुमार सिन्हा, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी संचालक, संशोधन व विकास विभाग, इस्रो !

पुणे, मानवाच्या उत्क्रांतीच्या काळापासून मानव त्याच्या गरजांच्या पूर्ततेसाठी सातत्याने विविध प्रयोगांच्या माध्यमातून वैज्ञानिक शोध लावत आला. आज मानवाने केलेल्या प्रगतीचा टप्पा पाहता विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवी जीवनाचा पाया आहे, हे वास्तव अधोरेखित होत असल्याचे मत वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि इस्रोच्या संशोधन व विकास विभागाचे माजी संचालक डॉ. अरूणकुमार सिन्हा यांनी व्यक्त केले. प्रवीण मसालेवाले ट्रस्टतर्फे फिरत्या विज्ञान प्रयोगशाळांमध्ये रूपांतरित केलेल्या दोन बसचा अर्थात ‘सुहाना फिरती विज्ञान प्रयोगशाळे’चा हस्तांतरण सोहळा डॉ. अरूणकुमार सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यसापीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आयसर पुणेच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. अपर्णा देशपांडे, वरिष्ठ शैक्षणिक तज्ज्ञ डॉ. दिलीप देशमुख, प्रविण मसालेवाले ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त आणि प्रविण मसालेवाले उद्योग समूहाचे अध्यक्ष राजकुमार चोरडिया, प्रविण मसालेवाले ट्रस्टचे विश्वस्त प्रदीप चोरडिया हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ज्ञान प्रबोधिनी हराळी केंद्राचे अभिजित कापरे आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे  डॉ. प्रताप रामराव पाटील यांच्याकडे बस प्रतिकृती देऊन हस्तांतरण करण्यात आले.  यावेळी बोलताना डॉ. अरूणकुमार  सिन्हा म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्राची प्रगतीची दिशा ठरवताना पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले. वैज्ञानिक आणि अभ्यासकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देत हरितक्रांती ते उपग्रह विज्ञानापर्यंतच्या प्रयोगांना चालना दिली. आज देशात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने जी झेप घेतली आहे, त्याचा मूळ पाया पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी रचून ही पथदर्शी वाटचाल आखून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल क्षेत्रात केलेली क्रांती महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या भारताचे दमदार पाऊल असून स्वावलंबी आणि आत्मनिर्भर भारतासाठी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आश्वासक आहे. देशाच्या जडणघडणीत संशोधन आणि विज्ञान संस्थांचा मोठा हातभार असून विविध कारणांनी अवकाशात सोडलेल्या उपग्रहांमुळे मानवी जीवन सुखकर झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी पाच वर्षांत ५२ उपग्रह सोडण्याचे उद्दिष्ट इस्रोने ठेवले आहे. दळणवळण, पर्यावरण, संवाद, कृषी, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर होण्याकडे आपली वाटचाल सुरू आहे.

यावेळी बोलताना डॉ. अपर्णा देशपांडे म्हणाल्या की, आयसरमधील वैज्ञानिक उपक्रम आणि खेळांच्या माध्यमातून विज्ञानासंदर्भातील मूळ संकल्पना मुलांना स्पष्ट आणि विकसीत व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केले जातात. मुलांचा वैज्ञानिक दृष्टीकोन आणि तार्कीक कौशल्य विकसीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भारताच्या ग्रामीण भागात देखील बुद्धीमत्ता दडलेली असून तेथील मुला-मुलींना फक्त संधी मिळणे आवश्यक असते. आज हस्तांतरीत केलेल्या सुहाना फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेमुळे या मुलांना संधींचे हे अवकाश उपलब्ध होणार आहे. आगामी पाच वर्षांसाठी  प्रविण मसालेवाले ट्रस्टतर्फे या बसला संपूर्ण सहकार्य केले जाणार असले तरी, ज्या संस्थांना या बस हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत, त्यांनी या उपक्रमात सातत्य ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर मदतीची यंत्रणा निर्माण केली पाहिजे.  विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाल्यास ते प्रश्न विचारण्याचे धाडस त्यांच्यात निर्माण होईल, असे पोषक वातावरण देणे देखील आवश्यक आहे.

यावेळी बोलताना प्रविण मसालेवाले ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त राजकुमार चोरडिया म्हणाले की, ग्रामीण क्षेत्रात आजही अनेक शाळेत विज्ञान प्रयोगशाळा नावालाच आहेत. काही शाळेत प्रयोगशाळा आहेत पण तेथे प्रयोगासाठी सुविधा नाहीत. किंबहुना प्रयोगशाळा अद्यावत नाहीत असे आमच्या तज्ज्ञांच्या सर्वक्षणात असे दिसून आले. विज्ञान प्रसार व प्रचारासाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या आम्ही शोधात होतो. योगायोगाने गणित, विज्ञान व खगोलशास्त्रासाठी कार्य करणाऱ्या ज्ञान प्रबोधिनी- हराळी केंद्र धाराशिव तसेच परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या संस्थांची माहिती उपलब्ध झाली.

या दोन्ही संस्थांनी फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेची आवश्यकता असल्याचे सांगून साह्य करण्याची मागणी केली. आम्ही दोन्ही संस्थेस भेटी देऊन मागणीची पडताळणी केली. या सर्व प्रयत्नातून विज्ञान वाहिनी, पुणे यांच्या तांत्रिक मदतीने दोन्ही जिल्ह्यासाठी फिरत्या विज्ञान प्रयोगशाळा विकसित करण्यात आल्या आहेत.फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेतून प्रात्यिक्षिकाव्दारे विज्ञान शिकविण्यासाठी इयत्ता आठवी ते दहावीच्या विज्ञान अभ्यासक्रमाचे अत्यंत दर्जेदार साहित्य आणि साधने सुयोग्य रसायनासह दिली आहेत. बरोबरच कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) तंत्रज्ञान तसेच खगोलशास्त्र या विषयांचा खास समावेश केला आहे. मराठवाड्याचे तापमान विचारात घेऊन फिरती विज्ञान प्रयोगशाळा वातानुकूलित केली आहे. यात सी. सी. टी. व्ही. कॅमेरे व जी. पी. आर.एस. प्रणाली आहे. तसेच किमान पाच तासांसाठी बॅटरी बॅकअप सुविधा, लॅपटॉप, प्रोजेक्टर, साऊंड सिस्टीम आणि सॉफ्टवेअर अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. फिरती विज्ञान प्रयोगशाळा ही सेवा मागणी केलेल्या शाळेत वर्षातून दोन वेळा सेवा देईल. अशा पद्धतीने दोन्ही जिल्ह्यात वर्षभरात सुमारे २०० माध्यमिक शाळेतील २० हजार विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञानाच्या संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल.

यावेळी शिक्षण तज्ज्ञ डॉ. दिलीप देशमुख, प्रविण मसलेवाले ट्रस्टचे विश्वस्त प्रदीप चोरडिया, ज्ञान प्रबोधिनी हराळी केंद्राचे अभिजित कापरे आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे  डॉ. प्रताप रामराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पोपट काळे यांनी आभार मानले.

Leave a Comment