तरुणांनी समाज माध्यमांच्या आहारी जाऊ नये – डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ !

पुणे, कुटुंबव्यवस्था आणि मुल्याधिष्ठीत जीवन पद्धती ही भारतीयांची ओळख असून या दोन मूल्यांच्या जोरावर आपण संपूर्ण जगाला आव्हान देऊ शकतो. याची जगाला जाणीव असल्यानेच भारताची सृजनशील क्रयशक्ती समाज माध्यमांमध्ये अडकवून ठेवणे आणि समाज माध्यमाव्दारे त्यांची जीवनदृष्टी कलुषित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर तरूणांनी समाज माध्यमांच्या आहारी जाऊ नये, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.
श्री पूना गुजराती बंधू समाजतर्फे दहावी-बारावीत उत्तम गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभाचे आयोजन कोंढवा येथील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या देसाई बँक्वेट हॉलमध्ये करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. पराग काळकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर श्री पूना गुजराती बंधू समाजचे अध्यक्ष नितीन देसाई, कार्यकारी संचालक राजेश शहा, सह कार्यकारी संचालक नैनेश नंदू, उपाध्यक्ष 

वल्लभ पटेल, सचिव राजेंद्र शहा, खजिनदार हरेश शहा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दहावी-बारावीत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.  यावेळी बोलताना डॉ. पराग काळकर म्हणाले की, समाज माध्यमे तुमची विचार प्रक्रीया खुंटीत करून टाकतात. तुमच्या विचारांची दिशा भरकटवून तुमचे विचारविश्व प्रदुषित करीत असतात. आपण कसे जगायचे, कोणत्या दिशेने विचार करायचा याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दिशा देण्याचे काम समाज माध्यमे करीत असतात. तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही, याची जाणीव प्रत्येक तरूणाने ठेवली पाहिजे. करिअरच्या नवी कोणत्या वाटा चोखाळायच्या या बाबतीत पालक आणि शिक्षक मार्गदर्शन करीत असतात.

मात्र, अंतिम निर्णय हा मुलांमुलींनाच घ्यायचा असतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेत कधी नव्हे ती कमालीची लवचिकता आल्याने त्या लवचिकतेचा फायदा घेत व्यवसाय आणि छंद याची सांगड घालता आली पाहिजे. ज्या प्रमाणे एखादी वास्तू उभारताना त्याचा कच्चा आराखडा आधी तयार केला जातो. त्याच पध्दतीने निवडलेल्या क्षेत्रात जाण्याआधी त्या क्षेत्राचा कच्चा आराखडा तयार करणे आवश्यक असते.  ध्येय निश्चित करून केवळ आरंभशूरपणा न करता सातत्याने त्या दिशेने मार्गक्रमण केल्यास संकल्पपूर्ती होते. भूतकाळात अपयश आले असल्यास ते विसरून यशावर लक्ष केंद्रीत करा.

यावेळी बोलताना नितीन देसाई म्हणाले की, गुजराती समाज हा उद्योजकांचा समाज म्हणून सुपरिचीत आहे. उद्योग जगतात सचोटीने काम करीत नाव कमावलेले अनेक जण आपल्या समाजात आहेत. भविष्यात उद्योगाला शिक्षणाची जोड देत बुध्दीजीवी क्षेत्रात देखील आपल्या समाजाची उदाहरणे प्रस्थापित केली पाहिजे. यशाला मर्यादा नसतात. एका यशप्राप्तीनंतर पुढचे ध्येय आपल्याला खुणावत असते आणि ही सातत्याने सुरू राहणारी प्रक्रीया आहे. गुजरातमधील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणाच्या चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. परंतु, तिथे बाहेरील राज्यातील विद्यार्थी शिक्षण घेतात, मात्र तिथे शिक्षण घेणाऱ्या गुजराती मुलांचे प्रमाण अल्प आहे, हे चित्र बदलणे आवश्यक आहे.
यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि पालकांनी प्रातिनिधीक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश शहा यांनी केले. सूत्रसंचालन अनुजा सेलोत यांनी केले.

Leave a Comment