७.५ किलोची गाठ काढून महिलेचा जीव वाचवला !
नाशिक, आदिवासी भागातील मध्यमवयीन महिला गेल्या काही दिवसांपासून पोटदुखी आणि भूक न लागणे या त्रासांनी त्रस्त होती. तिला नामको रुग्णालयात दाखल करण्यात आले. कॅन्सर सर्जन डॉ. अमोघ काळे यांनी तिची प्राथमिक तपासणी करून तिला पोटाची सोनोग्राफी व इतर काही तपासण्या करण्याचा सल्ला दिला. प्राथमिक सोनोग्राफीत या महिलेच्या पोटात एक भलीमोठी गाठ असल्याचे दिसून आले, हि गाठ कॅन्सरची असण्याची शक्यता गृहीत धरून या महिलेची पेट स्कॅन तपासणी करण्यात आली. पेट स्कॅन मध्ये तिच्या संपूर्ण पोटात गाठ पसरलेली होती, डाव्या किडनी पासून उद्भवलेली ही गाठ जवळपास ४० सेंटीमिटर लांब व ३० सेंटीमिटर रुंद एवढ्या मोठ्या आकाराची होती. या गाठीमुळे पोटाच्या पोकळीतील लहान आणि मोठे आतडे दाबले गेले व उजव्या बाजूला ढकलले गेले होते, तसेच डाव्या किडनीला गाठेने वेढले होते. याव्यतिरिक्त पॅन्क्रिया, प्लीहा (spleen) आणि त्या आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांचीही स्थिती बदलली होती.
डाव्या किडनीला लागून असलेली गाठ आजूबाजूला महत्त्वाच्या अवयवांच्या जवळ असल्याने बायोप्सी करणे धोकादायक ठरले असते. त्यामुळे डॉ. अमोघ काळे आणि त्यांच्या शस्त्रक्रिया तज्ज्ञांच्या टीमने एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी — म्हणजेच पारंपारिक पद्धतीने उदरपोकळीला चिरा देऊन पोट उघडून त्यातून हि गाठ काढण्याची अवघड, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेत रुग्णाच्या डाव्या किडनीला देखील कॅन्सरची लागण झालेली असे असे गृहीत धरून किडनी काढण्याची शक्यता व रुग्णाची संमती घेऊन तयारी देखील करण्यात आली.
शस्त्रक्रियेदरम्यान उदर पोकळी उघडल्यानंतर गाठ मुख्यत्वे सॉफ्ट टिशू व फॅटी स्वरूपाची असल्याचे आढळून आले. तिने डाव्या बाजूचे आतडे आणि संपूर्ण पचनसंस्था उजव्या बाजूला ढकलली होती. अत्यंत कुशलतेने कोणत्याही महत्त्वाच्या रक्तवाहिनी किंवा अवयवाला इजा होऊ न देता ७.५ किलो वजनाची ही संपूर्ण गाठ डिसेक्शन करून एका तुकड्यात काढून टाकण्यात आली आणि डावी किडनीही काढण्यात आली.
साधारण दोन अडीच तास चाललेल्या या अवघड शस्त्रक्रियेमध्ये कमीतकमी चिरफाड करून अतिरिक्त रक्तस्त्राव होणार नाही याची परिपूर्ण काळजी डॉ.अमोघ काळे आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतली होती. कॅन्सर सर्जन डॉ. अमोघ काळे, भूलतज्ञ डॉ. डॉ. भूषण वडनेरे, सर्जरी रजिस्ट्रार डॉ. योगेश गोसावी, डॉ. अवनी काळे, यांच्या संपूर्ण टिमने फिजिशियन डॉ. अभिजित सोनवणे, हृदयरोग तज्ञ डॉ. चेतन जैन, नामको हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाखा जहागीरदार, सी.एम.ओ. डॉ. अनिस शाह तसेच सुनील जाधव, यश वाघ यांच्या सहकार्याने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
नामको हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या मेजर व सुप्रामेजर शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक सर्जरी कॉम्प्लेक्स तसेच सर्जिकल इन्स्ट्रूमेंट्स व इक्विपमेंट्सची उपलब्धता व डॉ. अमोघ काळे यांचे कौशल्यपूर्ण ज्ञान याच्या जोडीला शासकीय योजना यामुळेच अशा गंभीर शस्त्रक्रिया मोफत करणे शक्य होते असे नामको हॉस्पिटल विश्वस्त मंडळाने कळविले आहे.