महाराष्ट्रात स्थायिक राजस्थानी बंधूंनी जन्मभूमीशी नाळ घट्ट करावी – झाबर सिंहजी खर्रा, शहर विकास मंत्री, राजस्थान !

पुणे, ‘जहाँ न जाए बैलगाडी, वहाँ जाए मारवाडी’ या उक्ती प्रमाणे आपला मारवाडी समाज हा कष्टाळू आणि प्रामाणिक आहे, हे सिध्द होते. तो प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या जोरावर राजस्थानमधून येऊन आपला समाजबंधू महाराष्ट्रात स्थायिक झाला आहे. परंतु, आता महाराष्ट्रात स्थायिक राजस्थानी बंधूंनी जन्मभूमीशी नाळ घट्ट करावी, असे मत  राजस्थानचे शहर विकास मंत्री झाबर सिंहजी खर्रा यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या राजस्थानी समुदायाबरोबर ऋणानुबंध निर्माण करण्याच्या उद्देशाने राजस्थान सरकारच्या अधिपत्याखालील आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या राजस्थान फौंडेशनच्या पुणे विभागाची स्थापना करण्यात आली आहे. या राजस्थान फौंडेशनच्या पुणे विभागाचा पदग्रहण सोहळा आणि प्रवासी संवाद समारोह आज राजस्थानचे शहर विकास मंत्री झाबर सिंहजी खर्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राजस्थान फौंडेशनच्या पुणे विभागाचे अध्यक्ष मंगलचंद चौधरी, उपाध्यक्ष राजेंद्र बाठिया, सचिव रमेश कासट, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, राजस्थान फौंडेशनच्या आयुक्त डॉ. मनीषा अरोडा, पुरूषोत्तम लोहिया, वीणा म्य़ुझिकचे संस्थापक राजस्थान रत्न के.सी. मालू, राजेंद्र दाधीच, जय जिनेंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष आचल जैन, ज्येष्ठ विधीज्ज्ञ एस. के. जैन, राजकुमार चोरडिया उपस्थित होते. यावेळी राजस्थानचे पाली येथील खासदार पी.पी. चौधरी यांनी दृकश्राव्य प्रणालीव्दारे उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी झाबर सिंहजी खर्रा  यांनी राजस्थान फौंडेशनच्या पुणे विभागाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना सेवा आणि सहकार्याची शपथ दिली.

यावेळी बोलताना झाबर सिंहजी खर्रा  म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वावलंबी, सशक्त आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या समाजाचे आणि ओघाने राजस्थानचे योगदान मोलाचे ठरणार आहे. १४० कोटी भारतीयांसोबत देशाच्या विकासात आपल्याला योगदान द्यायचे असल्याने आपल्या राजस्थान राज्याचे आर्थिकदृष्ट्या उत्थान होणे आवश्यक आहे. सामाजिक समरसता आणि विकासासाठी प्रत्येकाने आपल्या क्षमता आणि योग्यतेनुसार हातभार लावावा. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून ज्या स्वातंत्र्यसेनानींनी स्वतःच्या आशा, आकांक्षा आणि स्वप्न बाजूला सारले, तसेच जे सैनिक देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देत आहेत, त्यांच्या प्रती खरी कृतज्ञता आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी उज्ज्वल भारताचे स्वप्न साकारणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात स्थायिक राजस्थानी बंधू-भगिनींसाठी राजस्थान सरकार सर्व स्तरावर मदतीचा हात पुढे करीत आहे.

तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी राजस्थान सरकार कटीबध्द आहे. पुण्यात राजस्थान भवनची निर्मिती करण्याचा मनोदय असून राजस्थान फौंडेशनच्या पुणे विभागाने यासाठी पुढाकार घ्यावा.

यावेळी बोलताना शेखर मुंदडा म्हणाले की, राजस्थानी समाजाने एकत्र येण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत राजस्थानी व्यापारी बंधूंचे मोठे योगदान आहे. राजस्थानची भूमी ही शौर्य, संस्कृती, परंपरा आणि पर्यटनासाठी ओळखली जाते. आज पुण्यात दहा लाखांहून अधिक राजस्थानी परिवार स्थायीक झालेले आहेत. या सगळ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी राजस्थान फौंडेशनचे कार्यालय पुण्यात सुरू होणे आवश्यक आहे. आज गोसेवेच्या माध्यमातून १०५० गोशाळा चालवल्या जात असून त्यापैकी ८०० गोशाळा राजस्थानी समाज चालवत आहे. आपला समाज हा धार्मिक आणि अध्यात्मिक वृत्तीचा असल्याने सज्जनता हा आपला मूळ स्वभाव आहे. मात्र, या सगळ्याबरोबर सक्रीयता देखील आवश्यक आहे.

यावेळी राजस्थान फौंडेशनच्या आयुक्त डॉ. मनीषा अरोडा यांनी राजस्थान सरकारच्या विविध योजनांची माहिती सादरीकरणाव्देर दिली. यावेळी वीणा म्य़ुझिकचे संस्थापक राजस्थान रत्न के.सी. मालू आणि ज्येष्ठ विधीज्ज्ञ एस. के. जैन यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजस्थान फौंडेशनच्या पुणे विभागाचे अध्यक्ष मंगलचंद चौधरी यांनी केले, तर उपाध्यक्ष राजेंद्र बाठिया पुणे विभाग सुरू करण्यामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओम चौधरी आणि डॉ. रवींद्र मिणीयार यांनी केले. राजस्थान फौंडेशनच्या पुणे विभागाचे सचिव रमेश कासट यांनी आभार मानले.

Leave a Comment